परतीचा पाऊस, दाजीपूर आणि मी
दाजीपूर म्हणजे माझं दुसरं घरच. आता गम्मत अशी की पावसाळ्यात जंगल आत जाण्यासाठी पूर्ण बंद असतं. म्हणजे... 'मी माझ्याच घरात जायचं नाही' असा सरंजामशाही हुकूम सरकारनं जारी केलेला असतो.
पण या दाजीपूरची माझ्या फायद्याची गम्मत अशी आहे की कागदोपत्री हे जंगल जेवढ्या भूप्रदेशात पसरलेलं आहे, त्याच्या कितीतरी अधिक बफर झोन मध्ये पसरलेलं आहे. या बफर झोन मध्ये कित्येक मंदिरं, छोट्या वस्त्या आहेत. आणि या वस्त्यातले लोक माझे स्नेही आहेत. तिथं माझी जेवणाखाण्याची, राहण्याची सोय आहे. आता कायद्याचा आदर राखून जंगलात जायचं नाही अशी खूणगाठ जरी मनाशी बांधली तरी निसर्गानं तो बफर झोन केवळ माझ्यासाठीच निर्मिला असल्यामुळं मला निसर्गाचा आदर राखण्यासाठी तिथं जावंच लागतं.
मग होतं असं की पावसाळ्यात, जंगल बंद असण्याच्या काळात मी ७-८ वेळा तरी त्या बफर झोन मध्ये जाऊन येतो. म्हणजे, एखाद-दुसरा दिवस मोबाईल नाही लागला तर 'दाजीपूरला गेलायस काय रे?' असे मेसेज इनबॉक्समध्ये येऊन पडलेले दुसऱ्या दिवशी बघायला मिळतात.
तसे अनेक किस्से आहेत दाजीपूरचे आणि माझे. पण हा एकच सांगण्यासाठी सगळा प्रपंच. परतीचा पाऊस माझ्यासाठी नेहमी विलोभनीय असतो. जाता जाता तो काहीतरी नेतोय असं वाटतं आपल्याकडून. या कालावधीत 'संध्यारंग' अनुभवायचे तर आपण सोबत दाजीपूरला जायला हवं. एकदा मी एकटाच गेलो होतो. शेवटच्या एसटीनं. पोहोचतो अंधार झाला होता. हवेत गारवा होताच पण पावसाचं कुठंच निशाण नव्हतं. रात्री बापूकडं मुक्काम केला आणि सकाळी नाष्टा करून एकटाच शिवगडला जायला निघालो. साडेआठ-नऊची वेळ; अनपेक्षित उकाडा सुरु झाला होता. मला शिवगडला पोहोचायला साडे आकरा झाले. उकाड्याने अंगाची लाही लाही होत होती.
थोडं पाणी पिऊन निवांत झालो. डोळे मिटून बसलो. 'ब्रह्मानंदी टाळी' मी इथं अनेकदा अनुभवलेली आहे. या वेळी देखील तोच अनुभव. पण मनात नाराजी होती. ज्याच्या ओढीनं मी इथवर आलो तो 'माझा परतीचा पाऊस कुठं गायब झाला?' या प्रश्नानं मन व्याकुळ झालेलं. थोड्याच वेळात ही व्याकुळता संपली आणि मी ध्यानस्थ बसलो. एकदम शून्य अनुभूती. दरम्यान तासभर गेला असेल. अंगावर पावसाचे थेंब पडले आणि मी शून्यातून बाहेर आलो. दोन-तीन मिनिटातच माझं अंग, मन आणि डोळे चिंब भिजून ओले झाले.
ज्याच्या ओढीनं मी घरापासून दूर निसर्गात माझं घर वसवलं; तो परतीचा पाऊस सुद्धा माझ्या ओढीनं मला भेटायला आलेला मी पाहिला; त्याच्या येण्याची कणभर देखील शक्यता नसताना.
भेटीची आंतरिक ओढ दोन्हीकडून असावी लागते. जशी त्या पावसाची आणि माझी.
Useful links