कोकण आणि मी

Go to content

कोकण आणि मी

Mandar Vaidya : master in web & graphics
Published by Me in Dapoli · 4 October 2023
Tags: HotelsinDapoliSagarSawaliHotelKinara
गेल्या आठवड्यात मी सागर सावलीची नवी वेबसाईट सुरु केली. हे काम २००९ पासून माझ्याकडे आहे. कालानुरूप नवे तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या कित्येक गोष्टी अजूनही माझ्यासाठी नवीन 'still learning' आणि 'trying to understand' वगैरे असल्यामुळं वेबसाईट वरील एका फॉर्म चे मेल माझ्या ई-मेल ला येतात. मग मी ते सागर सावलीच्या संबंधित हॉटेल ला पाठवून देतो. आता सगळंच सुरळीतपणे होतंय याची खात्री झाल्यामुळे हा प्रकार या आठवड्यात थांबेल. त्यांचे सर्व ई-मेल संबंधित हॉटेलला परस्पर जातील.

हे करताना मला सहजच १२-१३ वर्षांपूर्वीचा काळ आठवला. त्या काळी दापोली मध्ये इंटरनेट उपलब्ध नव्हतंच. सागर सावलीच्या वेबसाईट वरून आलेले सर्व ई-मेल इथे कोल्हापुरात बसून मी पाहात असे. तेव्हा NetONE हे भारत संचार निगमचं शब्दशः रांगणारं इंटरनेट वापरायचो मी. 1 mb ची फाईल download करायला ३ तास वगैरे लागायचे. त्या काळात आलेल्या सर्व इमेल ची व्यवस्थित टिप्पणी ठेऊन त्यांना फोन करून सांगत असे. हा फोन सुद्धा कित्येक वेळा लागत नसायचा. कित्येक वेळा म्हणजे २-२, ३-३ आठवडे फोन बंदच.

ज्या कामात वर्षभरातील फायदा १८००-२००० रुपये व्हायचा त्या कामासाठी मी ३-४ हजार रुपये खर्च करून महिन्यातून २-३ वेळा कोकणात जायचो. एकंदर सगळं आतबट्ट्यातच असायचं. Professionalism वगैरे मला कधी जमलाच नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की; व्यवसायातील एकही महायुद्ध मी जिंकलेलं नसलं, तरी छोट्या-मोठ्या लढाया खूप जिंकल्या आहेत. महत्वाचं म्हणजे अतोनात प्रेम करणारी माणसं मिळवली आहेत. नारळाच्या करवंटीसारख्या टणक माणसांच्या मनात भरलेल्या शहाळ्यांचा गोडवा अगणित वेळा चाखला आहे. मला हे सांगायला अभिमान वाटतो की माझ्या या धावपळीची, धडपडीची दखल सर्वानीच  घेतली आहे.

म्हणतात ना, आंधळ्याच्या गाई देव राखतो. तशी अवस्था होती माझी. कदाचित आज सुद्धा मी तसाच आहे. त्यामुळं पाठीशी उभी राहणारी, वेळेला आधार देणारी, मी पडू नये, बुडू नये म्हणून बोट घट्ट पकडून ठेवणारी माणसं मला लाभली हे माझं भाग्यच.

आजवरच्या अनेक टप्यांवर टक्के-टोणपे खात मी उभा आहे याचं कारण भगवंतानं माझ्या अवती-भवती पेरलेली माणसं. माझी पक्की खात्री आहे की या सगळ्यांच्या माध्यमातून भगवंत स्वतःच माझ्यावर बारकाईनं लक्ष ठेऊन आहे.
-
मंदार



Created by Me for You.
Back to content